(फिरूनी नवी भाग 7) पुन्हा एकदा तोच प्रवास. त्याच्या घरापासून तिच्या घरापर्यंत. वास्तविक बाइकवरून तो सहज पोचू शकला असता, इतक्या रात्री फारसे ट्रॅफिकही मिळालं नसतं, पण आता या क्षणाला त्याला त्याचा मेँदू पूर्ण बंद करायचा होता. त्याने सरळ कॅब बूक केली. ती कुठे आहे हे त्याला माहीत होतं. तिच्या घराशिवाय ती आज कुठेही असणार नाही. रात्रीचे बारा वाजले, कॅबच्या डॅशबोर्डमध्ये तारीख बदलली. आजची अधिकृत तारीख. निहालच्या मृत्यूची. ती काल सकाळी त्याच्या घरून बाहेर निघाली. तिचा एकही फोन त्याने उचलला नव्हता, पण तिचा तो व्हॉइस मेसेज ऐकल्यावर मात्र तो बावचळला. हा असा विचार आपण कसा काय केला. ती इतक्या विश्वासाने आज आपल्याकडे आली होती. आपण एकमेव मित्र उरलोय. अशावेळी तिला सोडून आपलंच दु:ख कुरवाळत तो कसा तिच्यापासून दूर निघून आलाय? तिरीमिरीत दूर निघून आला खरा, पण आता परत तिच्याकडे जाण्यासाठी मात्र त्याला हिंमत गोळा करावी लागली होती. कॅब तिच्या बिल्डिँगसमोर उभी रहिली, तेव्हा त्याने मान वर करून तिच्या खिडकीकडे पाहिलं. एरवी कायम अंधारी दिसणार्या खिडकीमध्ये आज एक दिवा लागलेला होता. जिना चढून त्याने बेल मारली तेव्हा त्याच्या मनामध्ये एक प्रश्न उभा राहिला. काल ती आली तेव्हा आपण एकटे नव्हतो, आज जर ती एकटी नसेल तर.... तिने मूव्ह ऑन व्हावं असं सर्वानाच वाटत होतं. त्यालापण... जर तिने खरंच मूव्ह ऑन व्हायचं ठरवलं तर... तिचे आईबाबा तिच्यासाठी स्थळं शोधत होते... त्याच्या मनामधले विचार अंतराळामधून कुठल्या कुठे जाऊन पोचले होते. तिनं दरवाजा उघडला, तेव्हा त्याच्या मनामधले विचार पुन्हा जमिनीवर आले होते. ती कालच आईवडलांशी भांडून आलेली आहे. काल रात्री आपण तिला हे असे परक्यासारखे वागवले आहे. इतक्यात ती काय कुणासोबत जाणार नाही, निमिष. रिलॅक्स! दारात ती त्याच्याकडे डोळे विस्फारून पाहत होती. “तू? पुन्हा इथे?” “अनि, सॉरी यार! आत येऊ का?” त्याने विचारलं. ती दारामधून बाजूला झाली पण तिने त्याला आत ये म्हटलं नाही. किमान तिने तोंडावर धापकन दरवाजा तरी आपटला नाही, हीच एक काय ती जमेची बाजू असा विचार करून तो घरात आला. आज तिच घर नीट आवरले होते. एका कोपर्यामध्ये एक मोगर्याच्या फुलांचा हार पडलेला होता. त्याच्यासमोर एक लाकडी फ्रेम. त्या लाकडी फ्रेममध्ये निहालचा फोटो. त्यासमोर लावलेली उदबत्ती. टेरिफिक. ज्या गोष्टीपासून तो दूर पळत होता, तीच इथे मुबलक प्रमाणात होती. निहालचा मृत्यू. ते मरण त्याच्या आणि तिच्या दोघांच्याही आयुष्यावर सावट बनून पसरलेलं होतं. “अनी… यार मी!” तो पुढे काही बोलण्यापूर्वीच तिने त्याचं वाक्य तोडलं. “जेवला आहेस का?” “भूक नाहीये मला” “माझा प्रश्न तो नव्हता. मी सकाळी इडली सांबार केलं होतं. आता सांबार संपलंय. पण इडलीचं पीठ आहे. पटकन मिक्सरला चटणी फिरवते. खाशील?” “नको. खरंच” “निमिष, रात्रीचे दहा वाजलेत. सव्वादहानंतर अश्विनवाला ऑर्डर घेत नाही. बाकी काही मिळणार नाही” “मी वाटेत पावभाजी खाल्ली” तो खोटं बोलून गेला. इतक्या सगळ्या खोट्या गोष्टी तिला सांगितल्यात, त्यात याची एक भर. “ठीक. मग चहा टाकू?” “नको. सरबत असलं तर दे” तिनं फ्रीझमधून पाण्याची बाटली काढली. ओट्याच्या बाजूच्या कपाटामधून कोकम सरबताची बाटली घेऊन तिनं एका ग्लासामध्ये सरबत बनवलं. तो आमसुली रंगाचा कोकम सरबत नामक प्रकार त्याला कधीच आवडला नाही पण आता तिला ते सांगत बसण्यात अर्थ नव्हता. त्यापेक्षा चहाला हो म्हटलं असतं तर अधिक बरं झालं असतं. हॉलमधल्या खुर्चीत बसून तो किचनमधल्या तिच्या हालचाली फक्त न्याहाळत बसला होता. तो तिच्या फ्लॅटवर पहिल्यांदा आला तेव्हा जितका ऑकवर्ड होता त्याहून शंभरपटीने आज तो ऑकवर्ड होता. काय बोलावं ते त्याला सुचत नव्हतं. ती सरबताचा ग्लास त्याच्या हातात देऊन तशीच अवघडून उभी राहिली. उगाच त्याने त्या रंगीत पाण्याचा एक घोट घेतला. इकडे तिकडे नजर फिरवली. समोर एक पुस्तक पडलं होतं. जमुनाचं. तीच ती कंटेंट ओरिजिनेटर. त्याला त्याच्या पहिल्या प्रेमाविषयी अगदी समजून उमजून विचारणारी. त्या तीन भागाच्या सिरीजमधलं पहिलंच. त्याने दारावरची बेल मारली तेव्हा अनिशा कदाचित हेच पुस्तक वाचत बसली असावी कारण पुस्तक अजून उघडं होतं, आणि सहज पालथं ठेवलं होतं. या पुस्तकाच्या कव्हरवर तीच मुलगी होती. मीटिंग सुरू असताना त्याने सहज काढलेलं चित्र. सायकल घेऊन जाणारी दोन वेणीवाली ती मुलगी. ते दृश्य त्याच्या मनामध्ये कितीवेळा येऊन गेलं होतं... त्या दिवशी अति शहाणपणा करत तिच्याशी तो बोलला नसता. व्यवस्थित स्वत:ची ओळख करून दिली असती, तर कदाचित्त ती निहालऐवजी त्याची बेस्ट फ्रेंड झाली असती. ती दोन वेण्यावाली मुलगी कदाचित त्याची गर्लफ्रेंडही झाली असती... कुणी सांगावं, काय घडलं असतं... पण किमान तीच मुलगी अशी त्याच्या समोर इतकी अवघडून गप्पगप्प तरी बसलेली नसती. त्याची नजर त्या पुस्तकावर पडलेली दिसली तेव्हा ती म्हणाली, “आय लाइक हर. छान लिहिते ही” “किती पुस्तकं वाचलीस तिची?” “अलमोस्ट सगळीच. अमेझिंग डिटेलिंग असतं. खूप विचार करून रिसर्च करून लिहिते. तू वाचलंयस कधी तिचं?” त्यानं हातातला तो सरबतचा ग्लास बाजूला ठेवला. ते पालथं टाकलेलं पुस्तक उचललं. जमुना आणि तो. ही पब्लिशिंग इंडस्ट्रीमधली जोडी होती. तिच्या प्रत्येक पुस्तकाला त्याचंच चित्र होतं. पुढे जेव्हा जमुनाच्या पुस्तकांवर फिल्म्स, वेब सिरीझ निघाल्या तेव्हा तिच्या हट्टामुळे त्या सर्वांचं पोस्टरही त्यानेच केलेलं होतं. आणि ऑफ कोर्स, तिच्या प्रत्येक लेखनाचा पहिला वाचक तोच होता. त्याने पुस्तकाचं पहिलं पान उघडलं. कव्हर पेज आर्टिस्ट म्हणून त्याचं नाव होतं. अनिशाला त्या नावावर बोट ठेवून त्यानं दाखवलं. “निमिष अधिकारी? सिरीयसली?” ती चित्कारली. तिच्यासाठी ही माहिती नवीनच होती. “इतकी तिची पुस्तकं वाचलीस आणि माझं नाव कधीच वाचलं नाहीस?” त्यानं मुद्दाम तिला चिडवत विचारलं. वातावरणामधला ताण हलका करायचा एक मार्ग त्याला मिळाला. “नाही ना. हे तिचं पहिलंच पुस्तक ना? तू काढलेलं चित्र आहे हे? माय गॉश. कसलं क्यूट चित्र आहे हे. मी जबरदस्त फॅन आहे रे तिची.” “थॅंक यू! आणि हा, तुला कधी जमुनाला भेटायचं असेल तर मला सांग. माझी खूप चांगली मैत्रीण आहे. नेक्स्ट टाइम ती मुंबईत आली की आपण डिनरलाच भेटू तिला.” “आईशप्पथ! काय सांगतोस?” “अरे, खोटं कशाला सांगू? पण अनिशा मला एक सांग. तू शाळेत असताना सतत अगाथा क्रिस्ती नाहीतर ती भुतांची पुस्तकं वाचायचीस. ते सोडून इकडे या लव्ह स्टोरीज वाचायच्या फंदात कधी पडलीस?” “जेव्हा माझी स्वत:ची लव्ह स्टोरी अपूर्ण राहिली तेव्हापासून...” तिनं मॅटर ऑफ फॅक्टली उत्तर दिलं. वातावरणामध्ये इतकावेळ तो असोशीने दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असलेला ताण परत एकदा त्या दोघांच्या दरम्यान आला. “निमिष, अजून कुठल्या पुस्तकांसाठी तू कव्हर्स केलीयेत?” “मार ना कधीतरी गूगल सर्च माझ्या नावाने. बघ काय काय माहिती मिळतेय” “इंटरेस्टिंग माहिती नक्कीच मिळेल. बरं ऐक, सलोनीने तुला विचारलंय” “काय?” “अरे, म्हणजे बरा आहेस ना. वगैरे” “बरा नसायला मला काय धाड भरली आहे” “धाड भरली नव्हती तर काल सकाळी मला तुझ्या फ्लॅटवर एकटीने सोडून का गेलास?” अनिशाने त्याच्यावर अखेर तो वार केलाच. तो आल्यापासून ती त्याला न्याहाळत होती. तिचा तो व्हॉइस मेसेज ऐकल्यावर तो फोन करेल, सॉरी म्हणेल काहीबाही कारणं देईल अशी तिची अपेक्षा होती. पण यापैकी काहीही न करता तो थेट रात्री तिच्या समोर उभा ठाकला होता. त्याची मन:स्थिती हार काही चांगली दिसतच नव्हती. विषयाला तोंड फोडायचं होतं पण कसं ते त्याला नक्कीच समजत नव्हतं. एरवीही निमिष कमीच बोलणारा. अगदी कमी मित्रांमध्ये रमणारा. निहाल उलट जगन्मित्र. सरकारी कार्यालयाच्या शिपायापासून ते वरच्या लेव्हलच्या ऑफिसरपर्यंत त्याची ओळख. आताही आल्यापासून निमिषची चुळबुळ सुरू होती. माफी तर मागायची होती पण कशी? बोलू कसे? मनामध्ये विचारांची अनंत आवर्तने घेऊन दोघे केव्हाचे समोरासमोर बसले होते. “मी सॉरी म्हटलं तर मला माफ करशील?” त्यानं अगदी हलक्या आवाजात तिला विचारलं. “माफ करायला तू काही चूक केली नाहीस. आय नो. निमिष. हे सारं किती किचकट होतय हे मला माहीत आहे. निहाल... आज निहाल असता ना तर तिघं बसून आपण किती काय बोललो असतो. किती काय चेष्टा केली असतीस तू माझी... आणि.... मी उगाच परवा तुझ्या घरी आले. आय क्रॉस्ड द लाईन” “ नो, यु डिड्न्ट. अनि. यार. तू माझ्या घरी त्या दिवशी आलीस. मला हक्काचा मित्र समजून. तुला समजलं तरी का, त्या एका कृतीमुळे.. निहाल जर आज इथं असता ना, तर तुझ्यावर ही अशी वेळ आलीस नसती ना गं. आईवडलांचं घर सोडून अशी तू वेळीअवेळी एकटी राहिलीच नसतीस. या सगळ्याला मी कारणीभूत आहे.” “नको ना, आता पुन्हा तेच तेच गिल्ट दोषारोपाचं सत्र. घडून गेलंय ते. मी त्यातून बाहेर येण्याचा पुष्कळ प्रयत्न करतेय. बिलीव्ह मी. गेली पाच वर्षं आयुष्य पॉझ बटणावर थांबवून ठेवलं होतं. वाटायचं निहाल आहेच इथं कुठेतरी. येईल परत. आता कणाकणाने ही जाणीव बळकट होत चालली आहे. की तो येणार नाही. पूर्वी मला दिसायचा तो. आता तू जसा समोर बसलेला दिसतोयस ना थेट तसाच. बोलायचाही माझ्याशी. पण आता तो धुरकट होत चाललाय. त्याचं अस्तित्व नाही हे माझ्या मनाने मान्य करायला सुरुवात केली आहे आणि मला त्या क्षणाची खूप भिती वाटते रे. तो क्षण जेव्हा माझं मन हे पूर्ण मान्य करेल की निहाल या जगात नाहीये. निहाल माझ्या अवतीभवतीसुद्धा नाहीये. निहाल इज नो मोअर!” बोलता बोलता तिचा आवाज भरून आला. अचानक तिला हुंदका फुटून ती रडायला लागली. “अनि, यार प्लीज तू रडू नकोस ना” तो तिच्या या ओक्साबोक्षी रडण्याने गडबडला. उठून तो तिच्याजवळ गेला. तिच्या केसांमधून हलकेच हात फिरवत राहिला. कितीतरी वेळ ती रडत होती कुणास ठाऊक. तो शांतपणे फक्त तिच्याजवळ होता. हळूहळू तिचं रडं ओसरलं. तसं त्याने तिला जवळ ओढून घेतलं. तिला कुशीत घट्ट घेऊन तो कितीतरी वेळ तसाच बसून राहिला. त्याच्या छातीवर डोकं ठेवून ती निपचित पडून राहिली. त्यच्या जिवंत हृदयाचे ठोके मोजत. थोड्यावेळाने कधीतरी त्याला जाणवलं की तिचे डोळे मिटलेत. ती प्रगाढ झोपली होती. हलक्या हाताने त्याने तिला उचललं. तिच्या बेडवर आणून निजवलं. परवाच्याच रात्रीचा हा सीन रिपीट होतोय, निमिष. त्याने स्वत:ला बजावलं. तरी तिला अद्याप गाढ झोप लागलेली आहे हे चेक करून तो उठून हॉलमध्ये आला. निहालच्या फोटोसमोरची उदबत्ती संपत आली होती. त्याने अजून एक उदबत्त्ती लावली. निरांजन कधीचे शांत झाले होते. तेही त्याने लावले. उठून हॉलचा लाइट घालवला. शांत स्निग्ध निरांजनाच्या प्रकाशामध्ये निहाल हसरा समोर बसला होता. काही न सुचून निमिषने त्याच्यासमोर हात जोडले. पुन्हा एकदा माफी मागितली. ती कधीच मिळणार नाही आणि आपण या सार्या जंजाळामधून कधीच सुटू शकणार नाही याची त्याला कल्पना असूनही. रात्र फारच चढली, तेव्हा तो तिथेच बाजूला जमिनीवर आडवा पडला. झोप नीट अशी लागलीच नाही पण जागाही राहिला नाही. पहाटे कधीतरी अनिशाला जाग आली. तिने उठून बेडरूमचा दिवा लावला. समोरच्या फिश बोलमधला राज त्या प्रकाशाने जागा झाला होता. तिने त्याला डबीमधून थोडे दाणे खायला दिले. फ्रेश होऊन ती हॉलकडे आली तेव्हा तिला तिथे निहालच्या फोटोसमोर जमिनीवरच झोपलेला निमिष दिसला. “निमिष! अरे निमिष” तिने त्याला हाक मारली. तो हूँ का चूं झाला नाही. कितीवेळ रात्रीचा जागा होता कुणास ठाऊक. जेव्हा जाग येईल तेव्हाच पाहू, असा विचार करून ती बेडरूममध्ये परत आली. येताना तिथेच बाजूला पडलेलं ते जमुनाचं पुस्तक मात्र तिनं उचलून घेतलं. आता तिला परत तशी झोप आलीच नसती. त्यापेक्षा चहा घेत पुस्तक वाचत पडावं असा विचार तिनं केला. किचनमध्ये येऊन गॅसवर तिनं चहाचं आधण ठेवलं. पुस्तक तिनं ओट्यावर बाजूला ठेवलं होतं. काल रात्रीपासून काहीतरी खटकत होतं. काहीतरी प्रचंड चुकतंय असं तिला वाटत होतं. परीक्षेमध्ये एखादं गणित चुकल्याचं घरी आल्यावर कसं होतं. तसं काहीतरी. काहीतरी समोरच प्रचंड आहे आणि आपल्या ते लक्षात येत नाहीये असं काहीतरी. काल रात्री झोपेतही तिला काहीबाही असंच दिसत होतं. एकाकी वाट. तिन्हीसांजेची वेळ. खुनी चेहरे असलेला टीशर्ट घातलेला निहाल. तिचं आणि त्याचं दप्तर सायकलला अडकवून सायकल चालवत नेणारा निहाल. तिच्या गालाला हलकाच स्पर्श करून तिला स्टुपिड म्हणणारा.... चहाचा कप घेऊन ती वळाली. ओट्यावर राहिलेलं पुस्तक घेण्यासाठी अगदी किचनच्या दारापर्यंत जाऊन ती परत आली. तेव्हा अचानक जाणवलं. खिडकीच्या बाहेर पूर्वेला झुंजूमुंजू होत होतं. त्याची तिरीप पुस्तकाच्या कव्हरवर पडलेली होती. असाच तिन्हीसांजेचा फिकट पिवळा प्रकाश. ती सायकलवरून जात होती.. समोर तो उभा होता. बर्मुडा शॉर्ट आणि कसलासा विचित्र टीशर्ट घालून. त्याच्यासमोर ती उभी होती. दोन वेण्या घालून. जमुनाच्या पुस्तकाच्या कव्हरवर ती उभी होती. लव्ह अॅट फर्स्ट साइट नावाच्या एका लव्ह स्टोरीच्या पुस्तकावर निमिष अधिकारीने त्याला ती पहिल्यांदा जेव्हा दिसली तेव्हाचे चित्र काढले होते. क्षणार्धात या सर्वाचा अर्थ तिच्या लक्षात आला आणि ती जागच्या जागी थिजून गेली. (क्रमश:)