ऐहोळे ५: मेगुती टेकडीवरील बौद्ध, जैन मंदिरे आणि अश्मयुगीन दफनस्थळे

9 months ago 19

    बदामी १: चालुक्यांचा संक्षिप्त इतिहास आणि बदामी लेणी बदामी २: बदामी किल्ला, मंडप, धान्यकोठारे आणि शिवालये बदामी ३: भूतनाथ, मल्लिकार्जुन मंदिरे, विष्णूगुडी आणि सिदलाफडीची प्रागैतिहासिक गुहाचित्रे  ऐहोळे १ - जैन लेणे आणि हुच्चयप्पा मठ  ऐहोळे २: त्र्यंबकेश्वर मंदिर, जैन मंदिर आणि मल्लिकार्जुन मंदिर समूह  ऐहोळे ३:  दुर्ग मंदिर संकुल ऐहोळे ४: रावणफडी आणि हुच्चीमल्ली मंदिर      --------------------------------------------------------------------------------------------------------------------------    मेगुती टेकडी हे ऐहोळेतील सर्वात उंच ठिकाण. ऐहोळेतील कोणत्याही मंदिरातून मेगुती टेकडी सतत दिसत असते. आपण ऐहोळेतील पहिल्या भागात जे जैन लेणे पाहिले तेही आहे ह्या मेगुती टेकडीच्याच पायथ्याला. ऐहोळेतून जाणार्‍या मुख्य रस्त्यावरुनच मल्लिकार्जुन मंदिराच्या अलीकडून मेगुती टेकडीकडे जाणारी वाट आहे. तसेही ह्या टेकडीवर जाण्यासाठी असंख्य वाटा आहेत, कुठूनही चढता येते मात्र टेकडीवर असलेल्या तटबंदीमुळे मुख्य जैन मंदिरात जाणे तसे अवघड होईल. ह्या टेकडीवर आहेत तीन आकर्षणे, एक म्हणजे टेकडीच्या पाऊण उंचीवर असलेले बौद्ध लेणे, टेकडीच्या वर असलेले जैन मंदिर आणि टेकडीवर इतस्ततः विखुरलेली अश्मयुगीन मानवाची दफनस्थळे. मल्लिकार्जुन मंदिराच्या अलीकडून डांबरी रस्त्यावरुन एक कच्चा रस्ता मेगुती टेकडीवरील पायर्‍यांकडे जातो. इथे उन्हातान्हात बैल बांधलेले दिसतात आणि एकंदरीत अस्वछता दिसते. हुच्चयप्पा मंदिराच्या इथून दिसणारी मेगुती टेकडी आणि त्यावरील तटबंदी मेगुती टेकडीवर जाणार्‍या पायर्‍या व वर दिसणारे बौद्ध लेणे बौद्ध लेणे दक्षिण भारतात बौद्ध लेणी दुर्मिळ. बौद्ध लेण्या बहरल्या त्या मुख्यतः महाराष्ट्रातच. साधारण पाचव्या सहाव्या शतकानंतर त्यांचा सरता काळ सुरु झाला. ऐहोळेतील कोरली गेलेली बौद्ध लेणी आहे हे ती बौद्धकाळाच्या अस्तावेळची, साधारणतः सहाव्या शतकाच्या अखेरीसची. येथील बौद्धलेणे दुमजली आहे. लेणीसमोरच्या प्रांगणातच एक मस्तकविहिन बुद्धाची मूर्ती आहे, जी बहुधा आतल्या गर्भगृहातील असावी. लेणीच्या दोन्ही मजल्यांचीच छते प्रत्येकी चार पूर्णस्तंभ आणि दोन अर्धस्तंभांवर तोललेली आहेत. स्तंभांवर शिलालेख आहेत. ओसरी, सभामंडप आणि गर्भगृह अशी यांची रचना. बौद्ध लेणी स्तंभलेख ओसरीतील छतावर कमलासनावर बसलेली बुद्धप्रतिमा आहे, तिच्या मस्तकी तिहेरी छत्र आहे. गर्भगृहात काहीही नाही मात्र तिथे वटवाघळांचा वावर प्रचंड असल्याने प्रचंड कुबट वास येत असतो त्यामुळे शक्यतो आत जाणे टाळावे. लेणीच्या वरच्या मजल्यावर ओसरीच्या बाहेरुन एका अंगाने वाट आहे पण वरच्या मजल्याची रचनाही खालच्याप्रमाणेच असून आत काहीही पाहण्यासारखे नाही. लेणीच्या पुढ्यातून ऐहोळे गाव आणि मल्लिकार्जुन मंदिर संकुलाचे सुरेख दर्शन होते. बौद्ध लेणे पाहूनच अजून काही पायर्‍या चढून आपण माथ्यावर पोहोचतो. हा आहे ऐहोळेचा किल्ला आणि त्यात वसलेले आहे जैन मंदिर जैन मंदिर मेगुती टेकडीचा माथा बराचसा सपाटीचा आहे, माथ्याचा विस्तार जरी बराच बसला तरी तिचा थोडकाच भाग तटाबुरुजांनी बंदिस्त केलेला असून ह्याच भागात आहे ते मेगुतीचे जैन मंदिर. हे जैन मंदिर शक संवत् ५५४ (इ.स.वी. सन ६३२) मध्ये जैन साधक आणि कवी रविकिर्ती याने निर्माण केले. तसा शिलालेखच ह्या मंदिरावर त्याने कोरून ठेवलाय जो भारतातील सर्वाधिक महत्वाच्या शिलालेखांपैकी एक मानला जातो तीच आहे सुप्रसिद्ध ऐहोळे प्रशस्ती. हे मंदिर ऐहोळेतील अगदी सुरुवातीच्या मंदिरांपैकी एक असल्याने ह्याची रचना देखील सुरुवातीच्या मंदिरांसारखी आगळीवेगळी अशी मंडप शैलीची. दुमजली असलेल्या ह्या मंदिरात स्तंभयुक्त मुखमंडप असून सभामंडपातून आतल्या गर्भगृहात जाता येते. गर्भगृहात आसनस्थ महावीरांची मूर्ती असून आजूबाजूला काही मूर्तींचे अवशेष विखुरलेले आहेत. सभामंडपातून्च मंदिराच्या वरच्या मजल्यावर जाता येते, मात्र तिथे पडझड झाली असल्यामुळे संभाळून वर जावे लागते. वरच्या भागात काहीही नाही. मेगुती जैन मंदिर जैन मंदिर जैन मंदिर मागील बाजूने जैन मंदिर मुखमंडप सभामंडप गर्भगृह मंदिराच्या डाव्या बाजूस आहे तो उपरोल्लेखित रविकिर्तीने कोरुन घेतलेला सुप्रसिद्ध शिलालेख ज्यात पुलकेशी द्वितीय ह्याची प्रशस्ती गायली गेली आहे जी ऐहोळे प्रशस्ती ह्या नावाने विख्यात आहे. ऐहोळे प्रशस्ती ऐहोळे प्रशस्तीविषयी आपण बदामीच्या पहिल्या भागात अल्पसे वाचले असेलच. हा शिलालेख शुद्ध संस्कृतात असून ह्याची शैली पद्यमय असून शब्दरचना साहित्यिक आहे. अलंकारशास्त्रासाठी ही प्रशस्ती प्रसिद्ध आहे. ह्या शिलालेखाची सुरुवात जैन भिख्खू जैनेंद्र ह्याच्या प्रार्थनेने सुरु होऊन ह्यात चालुक्यांच्या प्रारंभिक शासकांचा उल्लेख येतो आणि त्यानंतर चालुक्य पुलकेशी ह्याचे गुणवर्णन गायले असून त्याच्या सैनिकी विजयांचे काव्यमय भाषेत सुरेख वर्णन येते. ज्यात पुलकेशीचा हक्क डावलून अन्यायाने राजा झालेल्या काका मंगलेशाच्या संहाराचे वर्णन असून कदंब, कोंकण मौर्य, लाट, मालव, गुर्जर ह्यांच्या पराभवाचे वर्णन येते. हर्षवर्धनासारख्या महापराक्रमी सम्राटाची हस्तिसेना नष्ट करुन त्याला हर्षरहित केल्याचे वर्णन करताना रविकिर्तीचे शब्द आटत नाहीत. ह्यानंतर पुलकेशीचे अजून गुणवर्णन करताना त्याने केलेल्या हाडवैरी पल्लवांच्या पराभवाचे वर्णन येते. त्यानंतर चोळ, पांड्य व केरलांनीही पुलकेशीचे मांडलिकत्व पत्करल्याचा उल्लेख येतो. पुलकेशीचे वर्णन त्याने 'सत्याश्रय' असे केलेले आढळते. सभामंडपाच्या मध्यभागात जो काळा आयताकृती चौकोन दिसत आहे तीच आहे ऐहोळे प्रशस्ती बदामीच्या पहिल्या भागात प्रशस्तीमधील काही श्लोक दिलेले असल्याने सर्व प्रशस्ती न देता काही अलंकारयुक्त श्लोक येथे देतो. पिष्टं पिष्टपुरं येन जातं दुर्ग्गमदुर्ग्गमम् चित्रं यस्य कलेर्वृत्तम् जातं दुर्ग्गमदुर्ग्गमम्॥ त्याने पिष्ठपुर नगराचे पीठ केले, त्या दुर्गयुक्त नगराला दुर्गरहित केले, त्याची चित्तवृत्ती अशी दुर्गम होती की ज्यात कलिवृत्तीचा प्रवेशही होणे दुर्गम होते. उत्साहप्रभुमन्त्रशक्तिसहिते यस्मिन्समस्ता दिशो जित्वा भूमिपतीन्विसृज्य महितानाराद्धय देवद्विजान्। वातापीन्नगरीप्रविश्य नगरीमेकामिवोम्मिमाम् चञ्चन्नीरधिनीलनीरपरिरखां सत्याश्रये शासति॥ उत्साह, प्रभुत्व आणि मंत्रशक्तीने युक्त असलेल्या पुलकेशी समस्त दिशा जिंकून जिंकलेल्या राजांना सोडून देवता आणि द्विजांची पूजा करुन वातापि नगरात प्रवेश केला. चंचल जलांनी घेरलेल्या पृथ्वीसमान ह्या नगरीवर सत्याश्रयाने शासन केले. ह्या नंतर येतो तो महाभारताचा उल्लेख असलेला सुप्रसिद्ध श्लोक. ज्यात भारती युद्धाचा काळ वर्णित केला आहे. त्रिशंत्सु त्रिसहस्रेषु भारतादाहवादितः। सप्ताब्दशतयुक्तेषु गतेष्वब्देषु पञ्चसु॥ पञ्चाशत्सु कलौ काले षट्सु पञ्चशतासु च। समासु समतीतासु शकानामपि भूभुजाम॥ तस्याम्बुधित्रयनिवारितशासनस्य सत्याश्रयस्य परमाप्तवता प्रसादम् शैलं जिनेन्द्र भवनं। भवनम्महिम्नां निर्मापितं मतिमता रविकीर्त्तिनेदम्॥ भारतीय युद्धाच्या ३७३५ वर्षांनंतर, कलियुगातील शकांच्या ५५६ वर्षांच्या कालखंडानंतर तीन समुद्रापर्यंत ज्याचे शासन होते त्या सत्याश्रयाच्या कृपेने ह्या जैन शैलमंदिराचे निर्माण रविकिर्तीने स्वतःच्या गौरवासाठी केले. ह्यांनतर रविकिर्तीने स्वतःस कालिदास आणि भारवीसम मानलेले दिसते. येनायोजि नवेश्मस्थिरमर्त्थविधौ विवेकिना जिनवेश्म। स विजयतां रविकीर्तिः कविताश्रित कालीदासभारविकीर्तिः॥ विवेकी रविकिर्तीने आपले अर्थविधान स्थिर करण्यासाठी ह्या जिनालयाची निर्मिती केली आणि कालिदास आणि भारवीसारखे यश आपल्या काव्याद्वारे अर्जित केले. ऐहोळेत कधी आलात तर मेगुती टेकडीवर जाणे विसरु नये, आणि वर आल्यावर मंदिरावरील हा लेख पाहणे चुकवू नये. आधी उल्लेख केल्याप्रमाणे ऐहोळेची टेकडी पसरट आहे हे लिहिलेच आहे, पण येथे केवळ मंदिरेच नसून त्यापेक्षाही अधिक प्राचीन काही आहे ते ही न चुकता बघावे. ती स्थळे आहेत अश्मयुगीन मानवाची दफनस्थळे अश्मयुगीन मानवाची दफनस्थळे बदामीच्या सिदलाफडी गुहेची सफर करताना आपण मागे अश्मयुगीन मानवांनी काढलेली चित्रे पाहिलीत, येथे मात्र आहेत ती त्यांची दफनस्थळे. बदामी, ऐहोळे परिसरातील दगडांच्या विशिष्ट रचनांमुळे आणि त्यातील गुहांमुळे अश्मयुगीन मानवांना सुरक्षित आश्रय उपलब्ध होत असे त्यामुळे येथे जागोजागी त्यांच्या वास्तव्याच्या खुणा आढळतात. ऐहोळेत आहेत ती त्यांची दफनस्थळे. ही स्थळे मात्र तटबंदीच्या बाहेरच्या भागातल्या पठारावर असल्याने तेथे उतरुन जाणे सहज शक्य नाही, आम्हालाही पुढे पट्टदकलला जायचे असल्याने येथे उतरणे वेळेअभावी रहित केले, मात्र तटबंदीवरुन ही स्थळे सहजी दृष्टीस पडतात. दोन तीन उभे केलेले सपाट दगड आणि त्यावर ठेवलेला सपाट दगड अशी ह्यांची साधीसुधी रचना. अश्मयुगीन दफनस्थळे अश्मयुगीन दफनस्थळे अश्मयुगीन दफनस्थळे ही स्थळे पाहूनच आम्ही मेगुती टेकडी उतरायला लागलो. टेकडीवरुन ऐहोळे गावाचे विहंगम दर्शन होते. ऐहोळे गाव ऐहोळे गाव व मलप्रभा नदी टेकडी उतरुन येईस्तोवर जवळपास दीड वाजत आला होता व आता आमचा प्रवास सुरु झाला तो पट्टदकलकडे, त्याविषयी पुढच्या भागात. क्रमशः 


View Entire Post

Read Entire Article