आजचा दिवस वेगळा होता म्हणूनच रोजनिशीत लिहीत आहे. शुक्रवार-शनिवार-रविवार हे इतर कामाचे म्हणजेच साफसफाई, किराणा-भाजीपाला आणणे इत्यादी. २ दिवस थंडी २ दिवस उन्हाळा असे ऋतू आहेत सध्या. थंडी अजूनही स्थिरस्थावर झालेली नाहीये. शनि-रवि कडे एक दिवस बाहेर जेवायला जातो. केसर इंडियन थाळी या उपाहारगृहात गेलो की आम्ही तिथे पाणीपुरी घेतोच घेतो. ६ पुऱ्यांमध्ये मी ४ व विनु २ खातो. एक भाजी घेतो त्याबरोबर भात येतोच. मी एक चपाती घेते. तर आज आम्ही बासुंदी आणि कुल्फी पण घेतली. बासुंदी आता इतिहासजमा झाली आहे. खरे तर मला बासुंदी खूपच प्रिय आहे. आम्ही विल्मिंग्टन मध्ये रहात असताना अतिशय चवदार अशी बासुंदी केली होती ती शेवटची. माझ्या वाढदिवसाला केली होती. त्या बासुंदीची आज प्रखरतेने आठवण झाली. भारतात रहात असताना पाणीपुरी मी दर महिन्याला खायचे. आता एक पुरी तोंडात घातल्यावर अगदी हळूहळू खाते ठसका लागण्याच्या भितीने. आज या उपहारगृहाच्या जवळच्याच इंडियन ग्रोसरी स्टोअर मध्ये गेलो होतो. इथे गेलो की मी नेहमी शेपू किंवा मेथी घेते. भारतात असताना मी रोज एक पालेभाजी करायचे. मला पालेभाजी खूपच प्रिय आहे.आता दूध फक्त चहापुरतेच. आधी होल मिल्क घ्यायचे. नंतर २% घ्यायला लागले. लॅक्टोज फ्री. आता अल्मोंड दूध आणि त्यात प्रोटीन पावडर. इथे अमेरिकेत आल्यापासून प्रोटीन पावडर घ्यायला सुरवात केली ती आजतागत. पहिल्यांदा स्लिमफास्ट घ्यायचो. नंतर plant based protein powder घ्यायला लागलो. भारतात असताना आम्ही दोघे दूधातून सुकामेव्याची पावडर घालून घेत होतो. एखादवेळेस मी दुधातून बोर्नव्हीटा घ्यायचे. अधुन मधून जाता येता पण खायचे. मला प्रचंड आवडतो.cereal चे बरेच प्रकार खाऊन पाहिले पण आता बंद केलेत. तर आजचा दिवस अजून एका कारणाकरता वेगळा गेला. आपण सगळेच युट्युबवर काही ना काही बघत असतो. त्यात एका मालिकेत पोहे करताना दाखवले. मला पोहे खूपच आवडतात. कालचा भात-भाजी खाल्ली होती. पण तरीही पोहे बघितल्यावर मला परत भूक लागली आणि आज मी भारतात असताना पोहे बनवायचे तसे बनवले म्हणजे लाल तिखट न घालता. तिखटपणा मिरच्यांचा होता. मी मिरच्या घातलेच पण लाल तिखट पण घालते. काही महिन्यांपूर्वी आम्ही दोघे असेच युट्युब वर काही पहात होतो. त्यात डोंबिवलीत कुठे कुठे वडा पाव चांगला मिळतो हे दाखवले होते. बटाटेवडे बघितल्यावर माझी भूक चाळवली आणि मी असेच बटाटेवडे केले होते. तुमचे होते का असे कधी? स्क्रीनवर पदार्थ करताना पाहिला आणि करावासा वाटला? Rohinigore